जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पाथरी शिवारातील जवळपास १० खांबांवरच्या ३५ हजारांच्या २८८० मीटर्स लांबीच्या वीज तारा तोडून चोरांनी चोरून नेल्याचा अजब चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे .
महावितरण कंपनीच्या म्हसावद विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ अकील मेवाती ( रा – बाम्बरूड राणीचे , ता – पाचोरा ) यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , त्यांच्याकडे वीजवाहिनीच्या मेंटेनन्सची जबाबदारी आहे . त्यामुळे त्यांना सतत शेतांमधून गेलेल्या वीज तारांची पाहणी करावी लागते . १३ नोव्हेम्बररोजी सकाळी त्यांना फोनवर पाथरी येथील शेतकरी सुका नेटके यांनी गट क्रमांक १६५ या परिसरातील शेतांमध्ये वीज नसल्याचे सांगितले होते . त्यानंतर या शिवारात जाऊन पाहणी केल्यावर डी पी वरील फ्युज काढून तुटलेले दिसले . पुढे १०० फूट अंतरावर वीज तारा कुणीतरी तोडून चोरून नेलेल्या दिसल्या . पुढे रमेश पाटील यांच्या शेतापासून विजय पाटील यांच्या शेतांपर्यंतच्या १० खांबांवरील ३५ हजारांच्या २८८० मीटर्स लांबीच्या वीज तारा तोडून चोरून नेलेल्या दिसल्या . चोरीला गेलेल्या या तारांचा या शिवारात शोध घेतला गेला पण काहीच सुगावा लागला नाही . त्यानंतर कनिष्ठ अभियंता मानसी माने यांच्या सूचनेवरून अकील मेवाती यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.