जळगाव ( प्रतिनिधी ) – आई, वडील, भाऊ व वहिणी नातेवाईकाच्या उत्तरकार्याला गेल्यावर घरात एकट्या असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी रामेश्वर कॉलनीत उघडकीस आली.
सूरज उर्फ लखन हरि कंगार (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली हे मात्र लगेच समजू शकले नाही. सूरज अविवाहित होता. एमआयडीसीत एका कंपनीत कामाला होता. रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ तो कुटुंबासह वास्तव्याला होता. रविवारची सुटी असल्याने तो एकटाच घरी होता वरणगाव येथे नातेवाईकाचे निधन झालेले असल्याने वडिल हरी कंगार, आई मालती, मोठा भाऊ मुकेश, वहिणी सकाळीच वरणगावला गेले होते. सायंकाळी त्याचा भाऊ मुकेश पुढे घरी आल्यावर सूरज याने घरात दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
दुपारी तीन वाजेच्या जवळपास त्याने गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. मुकेश व इतरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. हवालदार रतिलाल पवार यांनी पंचनामा केला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.