नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – देशांतर्गत सौर सेल आणि मॉड्यूल उत्पादनासाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत सरकार 24,000 कोटी रुपयांपर्यंत निधी वाढवणार आहे. सध्या ही रक्कम 4,500 कोटी रुपये आहे. ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर के सिंह म्हणाले, आम्ही सौर सेल आणि मॉड्यूल्ससाठी 4,500 कोटी रुपयांची योजना आणली आहे. आम्ही निविदा आमंत्रित केल्या आणि आम्हाला सौर उपकरणांसाठी 54,500 मेगावॅट क्षमता मिळाली. आम्ही सरकारला या योजनेअंतर्गत आणखी 19,000 कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. त्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आता आमच्याकडे 24,000 कोटी रुपयांची योजना आहे. आम्ही सौर उपकरणे निर्यात करू. सध्या देशात सौर मॉड्यूल निर्मिती क्षमता 8,800 मेगावॅट आहे. सोलर सेलची निर्मिती क्षमता 2,500 मेगावॅट आहे. एकात्मिक सौर पीव्ही मॉड्यूल्सच्या उत्पादन क्षमतेमध्ये 10,000 मेगावॅट जोडण्याचे लक्ष्य आहे. यासाठी सध्या 17,200 कोटी रुपयांची थेट गुंतवणूक करावी लागेल. 24,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवून, गुंतवणुकीचे प्रमाण आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता आणखी वाढवली जाईल. उर्जेसारख्या क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश आहे.
सरकार देशातील उत्पादक कंपन्यांना वेगवेगळ्या शीर्षकाखाली 1.97 लाख कोटींचे प्रोत्साहन देणार आहे. परदेशी कंपन्यांना भारतात आमंत्रित करण्यासोबतच, या योजनेचे उद्दिष्ट स्थानिक कंपन्यांना विद्यमान उत्पादन युनिट्सची स्थापना किंवा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.