मुंबई (वृत्तसंस्था ) – जम्मू-कश्मीरमध्ये दोन चकमकीत सुरक्षा दलांनी हिजबूल मुजाहिद्दीनच्या मोस्ट वाँटेड कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यातील एका दहशतवाद्याला आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण दिले जात होते.

मोबाईल फोनमधील डिजिटल पुराव्यातून याचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.कुलगाममध्ये दहशतवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे संयुक्तपणे शोधमोहीम राबवून सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. सुरुवातीला दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांनी लष्करावर गोळीबार सुरू केला. त्यामुळे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. हिजबूलचा कमांडर शिराज अहमद आणि यावर अहमद अशी ठार झालेल्या दोघा दहशतवाद्यांची नावे आहेत. दुसरीकडे बुंद बेमिनाच्या चकमकीत अमीर रियाझचा खात्मा करण्यात आला. रियाझ हादेखील हिजबूलचाच दहशतवादी असल्याचे उघडकीस आले आहे. शिराज हा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक होता.







