धामणगाव ( प्रतिनिधी ) – धामणगाव तालुक्यातील लिहा येथील २१ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. धामणगाव बढे पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुनम रोशन चरवंडे (वय-२१) रा. लिहा यांचा विवाह उन्हा येथील रोशन गुलाब चरवंडे यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने लग्न लावून दिले. दरम्यान लग्नात हुंडा न मिळाल्याच्या कारणावरून पती रोशन चरवंडे यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू , सासरे आणि दोन दिर यांनी शारिरीक व मानसिक त्रास देणे सुरू केले. माहेरहुन २ लाख रूपये घेवून ये, तेव्हा आमच्या घरात रहा असा दम दिला. या छळाला कंटाळून ९ नोव्हेंबर रोजी विवाहिता पुनम यांनी राहत्या घरात रूमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान विवाहितेच्या माहेरचे महेंद्रसिंग राजमलसिंग राजपूत चव्हाण यांनी १० नोव्हेंबर रोजी धामणगाव बढे पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रोशन गुलाब चरवंडे, सासू ज्योती गुलाब चरवंडे, सासरा गुलाब चरवंडे, दीर दिपक गुलाब चरवंडे आणि दीर संदीप गुलाब चरवंडे यांच्या विरोधात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष गंद्रे करीत आहे.







