जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी सकाळी वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रुग्णांसह अनेक जणांची कामे खोळंबली. अनेकांना अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांच्या कक्षाकडे धाव घ्यावी लागली. वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे रुग्णसेवेसाठी मोठ्या अडचणी आल्या.
नियमित वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले पंधरा दिवसांपासून हिवाळी सुट्टीवर आहेत. ते सोमवारी परतणार होते. मात्र त्यांनी अनेकांना दुपारी दोन वाजेपर्यंत येईल असा निरोप दिल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर्स , परिचारिका आदींनाही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या मिळाल्या नाहीत. त्यांचा प्रभारी पदभार पाहणारे उप वैद्यकीय अधीक्षक इम्रान पठाण यांना वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचा कार्यभार पाहण्याचे आदेशच नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
दुसरे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास मालकर मुंबई येथे कार्यालयीन कामानिमित्त गेले आहेत. त्यामुळे मंगळवारी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात गोंधळ उडाला. कक्षामध्ये कोणीच नव्हते. एक लिपिकदेखील सुट्टीवर असल्याने शासकीय कामासाठी आलेले नागरिक हेलपाटे मारत होते. तेथे बसणारे वैद्यकीय अधिकारीदेखील कालावधी संपल्यामुळे आलेले नव्हते. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांचे नातेवाईक तसेच शासकीय कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी आलेले नागरिक ताटकळून होते. अनेकांनी अधिष्ठाता कार्यालयाकडे धाव घेतली. अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांचेकडे समस्या मांडल्या. मात्र त्या समस्यांची पूर्तता झालीच नाही. त्यामुळे नागरिकांचा संताप झाला. दुसरीकडे शवविच्छेदन कक्षांमध्ये देखील एक मृतदेह शवविच्छेदनासाठी पडून होता. त्यामुळे नातेवाईक संताप व्यक्त करत होते.
वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयाचे प्रमुख असतात. मात्र रुग्णालयाचा प्रमुखच हरवल्यामुळे रूग्णालयाच्या कारभाराचा बोजवारा उडाला डॉ. फुलपाटील यांनी तातडीने वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे नियोजनाचे पूर्ण बारा वाजले.
दिव्यांग मंडळाच्या कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना कुपन हवे होते. कुपन देण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात कोणीच नव्हते. यामुळे दिव्यांग बांधवांनी देखील अधिष्ठाता कार्यालयात धाव घेतली. दिव्यांग मंडळात अनेकांना कुपन मिळेल अशा आशेने गेले. मात्र कुपन देण्याचे काम फक्त वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात चालत असल्यामुळे दिव्यांग मंडळाला अतिरिक्त कामाचा ताण पडला.
या सर्व गंभीर बाबींकडे डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. काही लोकप्रतिनिधींनी अधिष्ठाता यांची भेट घेऊन समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले यांच्या कारभारावर नाराजी वाढतच चालली आहे.







