जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे . आता या पक्षाचे सर्व २४ उमेदवार माघार घेतली आहे. .
भाजपनेते आमदार गिरीश महाजन यांनी आताच या बहिष्काराची घोषणा केली आहे यावेळी खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , आमदार मंगेश चव्हाण , पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार , भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते .
यासंदर्भात आमदार राजूमामा भोळे म्हणाले की , महाविकास आघाडीचे घटकपक्ष राज्यात सत्ताधारी आहेत . या आधी जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून दिले होते . आताच्या निवडणुकीसाठीती अशाच प्रयत्नांमध्ये आम्ही म्हणजे भाजप सर्व पक्षांसोबत सुरुवातीपासून होतो . जागावाटपापर्यंत सर्व चर्चा झाली होती मात्र ऐनवेळी भाजपचा अन्य पक्षांनी विश्वासघात केला आणि निवडणुकीला भाग पाडले गेले . आमची पहिल्या दिवसापासून सहकार्याचीच भूमिका होती . मात्र आम्हाला गाफील ठेऊन बाकीच्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्या . खरे तर हे विश्वासघाती आणि सत्तेच्या लालसेने राजकारण होते . जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे असे म्हणणारे सत्तेसाठीच असे बदलले . जिल्हा बँकेत ज्यांची सत्ता आहे त्यांचेच सहकारी कारखाने , सहकारी सूतगिरण्या , शैक्षणिक संस्था , उदयॊग आहेत . त्यांनीच जिल्हा बँकेकडून आपल्या अशा संस्थांसाठी कर्ज मिळवून घेतले आहे . ही सगळी त्यांची सुरुवातीपासून स्वतःच्या विकासाची खेळी आहे . शेतकऱ्यांना नुसते ‘बनवले’ गेले आहे . त्यासाठीच या निवडणुकीतसुद्धा त्यांना जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व कायम हवे होते . जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे असे म्हणणाऱ्यांनी जिल्हा बँकेकडून किती शेतकऱ्यांचा व अन्य उद्योगांचा विकास आतापर्यंत केला ? , या प्रश्नाचे उत्तर त्यांना जनतेपुढे द्यावेच लागणार आहे त्यासाठी भाजपचे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपासून , पंचायत समित्या , नगरपरिषद , महापालिका , जिल्हा परिषद , आमदार , खासदार असे सर्वच लोकप्रतिनिधी त्यांना पुढच्या काळात जाब विचारात रहाणार आहेत.