बर्लिन ( वृत्तसंस्था ) – जर्मनीत एका महिलेनं तिच्या ५ मुलांची हत्या केली आहे. पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्यानं महिला नाराज होती. मुलांना मारण्याआधी तिनं पतीला मेसेज केला. आता तू पुन्हा कधीच मुलांना पाहू शकणार नाहीस, असा मेसेज पतीला करून महिलेनं स्वत:च्या मुलांना संपवलं.या प्रकरणात महिलेला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मिरर युकेनं दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या महिलेसोबत पतीचा फोटो पाहून २८ वर्षांची क्रिस्टिन संतापली. तिनं तिच्या ५ मुलांना गळा आवळून संपवलं. ३ सप्टेंबर २०२० रोजी ही घटना घडली. क्रिस्टिनच्या सर्व मुलांचं वय ११ वर्षांपेक्षा कमी होतं. क्रिस्टिननं आधी मुलांना विषारी पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर गळा आवळून त्यांची हत्या केली. बाथटबमध्ये बुडवल्यानं आणि श्वास कोंडला गेल्यानं मुलांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं.
क्रिस्टिनला एकूण सहा मुलं होती. त्यातील पाच जणांना तिनं रागाच्या भरात संपवलं. तिचा मोठा मुलगा त्यावेळी घराबाहेर होता. त्यामुळे तो वाचला. मुलांना संपवल्यानंतर क्रिस्टिन डसेलडोर्फ रेल्वे स्थानकात पोहोचली. तिथे तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा जीव वाचला.
क्रिस्टिननं तिच्या पतीचा एका दुसऱ्या महिलेसोबतचा फोटो पाहिला. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय तिला आला. त्यातून तिनं पाच मुलांच्या हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी न्यायालयात ४० जणांनी साक्ष दिली. न्यायालयानं क्रिस्टिनला दोषी ठरवलं. तिच्या मोठ्या मुलाचा ताबा आजीला देण्यात आला आहे.