शासकीय रुग्णालयाच्या गेटवर वाहने लावणाऱ्यांची वाढली डोकेदुखी
जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य गेट समोर अनेक वाहनधारक त्यांच्या दुचाकी बेशिस्त पद्धतीने लावत असल्यामुळे रुग्णवाहिका आत येण्यासाठी अडचणी होत आहेत. सुरक्षारक्षकांच्या सूचनांना दुर्लक्ष करून तसेच त्यांच्याशी हुज्जत घालून हे वाहनधारक कोणाचे ऐकत नाही. बुधवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दक्ष पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या दक्षतेमुळे वाहतूक पोलिस शाखेने संबंधित वाहनधारकांना दंड करून त्यांना धडा शिकवला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये मुख्य गेट क्रमांक १ मधून आपत्कालीन वाहने रुग्णांना उपचारासाठी आणत असतात. गंभीर रुग्णांना वेळेत उपचार व्हावे यासाठी या गेट समोर वाहने लावण्यास मनाई आहे. सुरक्षारक्षक संबंधित वाहनधारकांना याबाबत सूचना करून वाहने दुसऱ्या बाजूला लावण्यास किंवा गेट क्रमांक २ मधून आत घेण्यासाठी नियमित सांगत असतात. तरी देखील अनेक वाहनधारक दोन मिनिटाचे काम आहे, लगेच येतो असे सांगून किंवा काही तर थेट आरडाओरडा करून त्यांचे वाहन तेथेच पार्किंग करतात. यामुळे उपचारांसाठी रुग्ण आणणाऱ्या रुग्णवाहिकाना अनेकदा गेटमधून वाहने आत घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात.
बुधवारी ३ नोव्हेंबर रोजी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास गेट समोर अर्धे गेट व्यापेल इतक्या दुचाकी बेशिस्त वाहन धारकांनी लावल्या. सुरक्षा रक्षकांचे वाहनधारकांशी वाद झाले. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांना कळताच त्यांनी तात्काळ वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाठवले.
वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ हजर होत वाहनधारकांना दंड केले. यामुळे वाहनधारकांना जरब बसला. या कारवाईद्वारे, बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई कायम सुरू राहील असा इशाराही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिला आहे.