मुंबई (वृत्तसंस्था) – परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने (ED) वारंवार समन्स बजावले होतं. मात्र, अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची पाच कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकराचा दिलासा देण्यास नकार दिल्याने आज अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंब गायब होते. अनिल देशमुख यांच्या घरावर चार ते पाच वेळा छापे टाकण्यात आले होते. परंतु देशमुख ईडीसमोर हजर झाले नाहीत.त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी केली. त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले. मात्र ते ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. त्यांचं म्हणणं ते वकिलामार्फत न्यायालयात मांडत होते. मागील पाच महिन्यांपासून यंत्रणा अनिल देशमुख यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांचा शोध कोणालाच लागत नव्हता. अखेर आज ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.