अमळनेर , जळगावच्या ‘ यशोदा ‘ अन डॉक्टर ‘ वासुदेवाची ‘
जीव वाचवण्यासाठी धडपड !!
जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘ जाको राखे साईया , मार साके न कोई ‘ हा श्रद्धाभाव आज जळगावात प्रत्यक्ष प्रचितीला येतोय . दीड दिवसाच्या बेवारस बाळाचा जणू नियतीशी संघर्ष सुरु आहे ! त्याला वाचवण्यासाठी ‘ यशोदा ‘ बनलेल्या अमळनेरच्या महिला पोलीस कर्मचारी व जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील महिला डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्यासह ‘ वासुदेवाची ‘ जबाबदारी प्रमाण मानणारे पुरुष पोलीस कर्मचारी आणि डॉक्टर्स त्याचा जीव वाचवण्याची धडपड करीत आहेत !
अमळनेर शहरातील बस स्थानक परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास बस स्थानकाच्या पाठीमागे नवजात स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत असल्याची माहिती मिळाली . त्यांनी वरिष्ठांना कळवून या नवजात अर्भकाला अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ जी . एम . पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचार करून त्याला जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला . त्यांनतर अमळनेरच्या पोलीस कर्मचारी सारिका जरे व सुनीता पाटील यांनी त्या बाळाला घेऊन जळगावचे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय गाठले . जळगावात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात या नवजात अर्भकाला १० २ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून चालक मनोहर पाटील यांना सोबत घेऊन या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखल केल्यावर सीएमओ डॉ . स्वप्नील कळसकर , बालरोगतज्ज्ञ् डॉ हितेंद्र भोळे , नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ शैलजा चव्हाण यांनी शक्य तेवढ्या उपचारांची व्यवस्था केली . या अवघ्या दीड दिवसाच्या या बाळाचे डुकरासारख्या प्राण्यांनी बाळाचे लचके तोडल्याने त्याला जांघेत , डोक्याच्या मागच्या भागात गंभीर जखमा झाल्या आहेत . शरीरावर अन्यत्रही मोठ्या जखमा झाल्या आहेत .
या बाळाच्या उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बालकांवर गंभीर अवस्थेत उपचारांची आवश्यक सुविधा नसल्याने त्याला गोदावरी महाविद्यालय रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे . त्यासाठी कायदेशीर सोपस्कार जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून पूर्ण केले जाणे सुरु आहे .
अगदी दीड ते दोन दिवस वय असले तरी ३ किलो वजनाचे हे तंदुरुस्त बाळ ( स्त्री जातीचे अर्भक ) पोलिसांसह डॉक्टरांच्याही प्रेमाला जणू पात्र ठरले आहे ! एकीकडे नियतीने नाकारले तरी माणसांच्या या प्रेमाचा जोरावरच त्याचा हा नियतीशी उभा दावा जणू त्याने मांडला आहे !