जळगाव ( प्रतिनिधी ) – नाशिकच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या विशेष पथकाच्या 24 सप्टेबरपासूनच्या कारवायांमध्ये अमली पदार्थ, अग्नीशस्त्रे, रेशन, जुगार, दारु, स्पिरीट, गॅस, डांबर अशा विविध अवैध धंद्यांवर सोळा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यात 63 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्या सर्वांकडून 2 कोटी 68 लाख 69 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डॉ. बी.जी. शेखर यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून 24 ऑगस्ट पासून सूत्रे स्वीकारली आहेत .अवैध पिस्टल, ड्रग्ज, गुटखा, अवैध लिकर अशा विविध अवैध गुन्हेगारी जोपासणा-या धंद्यांचे उच्चाटन करण्यावर भर दिला आहे.
नाशिक ग्रामीण व जळगाव या दोन जिल्ह्यात गावठी कट्ट्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली. नाशिक ग्रामीण (वाडी व-हे) व जळगाव (चोपडा शहर व चोपडा ग्रामीण) या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत सात आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 8 गावठी कट्टे, 28 जिवंत काडतुस, दोन मॅगझीन, एक मोटार सायकल व सहा मोबाईल असा एकुण 2 लाख 91 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुटख्यावरील कारवाईत मुक्ताईनगर व नंदुरबार (उपनगर) या दोन जिल्ह्यात कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमधे पाच आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 2 महिंद्रा पिकअप वाहने, विमल गुटखा असा एकुण 33 लाख 24 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रेशन धान्याच्या विशेष कामगिरीत नाशिक ग्रामीण (देवळा) व धरणगाव या दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यात पाच आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 2 ट्रक, रेशनिंगचा तांदुळ व गहु असा 19 लाख 13 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ब्राऊन शुगर, गांजा व चरस या अमली पदार्थाविरुद्ध धुळे (मोहाडी, चाळीसगाव रोड) आणि नाशिक ग्रामीण (रमजानपुरा) येथे कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमधे 12 आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून चरस गांजा, ब्राऊन शुगर व वाहने असा 12 लाख 96 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अवैध बायो डीझलवर नाशिक ग्रामीण (पवारवाडी) येथे करण्यात आलेल्या कारवाईत 5 आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 23 हजार 200 लिटर बायो डीझल भरलेल्या टॅंकरसह इतर मुद्देमाला असा 43 लाख 36 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध दारुवरील कारवाईत धुळे (शिरपुर शहर) येथे दोन आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून एक टेम्पोसह अवैध दारु असा 9 लाख 27 हजार 680 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध स्पिरीटवरील कारवाईत धुळे (शिरपूर) येथे सहा आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 2 टॅंकरसह अवैध स्पिरीट रसायने असा 86 लाख 37 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध गॅस डांबर चोरीच्या गुन्ह्यात पारोळा येथे करण्यात आलेल्या कारवाईत पाच आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 1 गॅस टॅंकर, 2 डांबर टॅंकर, 3 टेम्पो ऑईल, 1 स्कॉर्पीओ वाहन, ओमनी, 20 गॅस सिलेंडर असा 63 लाख 1 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारावरील कारवाईत नाशिक ग्रामीण (मालेगाव शहर) येथे 15 आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 12 मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 1 लाख 40 हजार 740 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.