जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दोन दिवसांपूर्वी एक परिपत्रक काढून शासकीय कार्यालयांमध्ये आता अभ्यागत, अधिकारी व कर्मचारी यांना मास्क अनिवार्य राहील असे आदेश काढले आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मास्क नसणाऱ्यांना आता दोनशे रुपये दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेटायला येणारे नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे मास्क नसतील तर तहसीलदार पंकज लोखंडे दंडात्मक कार्यवाही करतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली. जिल्हा परिषद कार्यालयामध्ये संबंधित विभाग प्रमुख तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना मास्क नसलेल्यांवर कारवाई करण्याचे सांगितले आहे. जिल्हा परिषदेमध्ये अनेक महिन्यापासून मास्क घातल्याशिवाय प्रवेशच देत नाहीत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी स्नेहा कुडची पवार यांनी दिली.
महानगरपालिका मध्ये अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांना मास्क नसलेल्यांवर कारवाई करण्याचे यापूर्वीचे आदेश शासनाच्या आताच्या नवीन परिपत्रकाला देखील लागू करण्यात आल्याची माहिती उपायुक्त श्याम गोसावी यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अधिष्ठाता कार्यालयात मुख्य रोखपाल नरेंद्र वाघ व रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात सुरक्षा समितीचे प्रमुख तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यांच्याकडे दंडात्मक कार्यवाही बाबतचे परिपत्रक शनिवारी प्रशासकीय अधिकारी डॉ जितेंद्र सुरवाडे यांनी काढले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामध्ये मात्र आदेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण यांनी दिली. सोमवारपासून याबाबत कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये प्रभारी पोलिस गृह उपअधीक्षक विठ्ठल ससे यांनी सांगितले की, आदेश प्राप्त झाला आहे. अद्याप सक्षम अधिकारी नेमला नसून सोमवारपासून पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यवाहीला सुरुवात होईल. महावितरण कार्यालयात देखील याबाबत अंमलबजावणी होत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.