‘ जो जिता वही सिकंदर !’ ; हेच राजकारणाचे पायाभूत सूत्र ; जळगावात तत्वाने नाकारलेले सांगलीत सोयीने उचलले

जळगाव ( प्रतिनिधी ) – सांगली जिल्हा बँक आणि महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या वर्चस्वाला धक्का लागू नये म्हणून आणि काँग्रेसला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या प्रेमात पडले आहेत . यानिमित्ताने ‘ जो जिता वही सिकंदर !’ ; हेच राजकारणाचे पायाभूत सूत्र असल्याचे अधोरेखित होत असले तरी जळगावात राष्ट्रवादीने तत्वाने नाकारलेली तडजोड सांगलीत सोयीने उचललेली कशी योग्य ठरते ?, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे .
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात कदापिही काँग्रेस आणि वसंतदादा पाटील घराण्याचे वर्चस्व वाढलेले जयंत पाटील यांना परवडणारे नाही . या अगतिकतेतून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्थानिक भाजप नेत्यांशी जुळवून घेण्याच्या विचारात आहेत . लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला साथ दिल्यानेच काँग्रेसला सांगली आणि कोल्हापूरच्या जागा गमवाव्या लागल्या होत्या . त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादीने राज्याच्या सत्तेसाठी शिवसेना आणि काँग्रेसशी जुळवून घेतले . तरीही आता सांगलीच्या राजकारणातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जयंत पाटील भाजपशी जुळवून घेत आहेत . सांगली महापालिकेतून काँग्रेसला घालवण्यासाठीही १० वर्षांपूर्वी जयंत पाटलांनी भाजपचीच मदत घेतली होती .
दुसरीकडे भाजपच्या केंद्रातील सरकारने राज्यातील शिवसेना , काँग्रेस आणि काही राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करीत त्यांच्यामागे विविध कारणांनी चौकशा लावल्या आहेत . अशा नको असलेल्या चौकशापासून सुरक्षित राहण्याची राजकारणातील तात्कालिक गरज पूर्ण करण्यासाठीही जयंत पाटील स्थानिक पातळीवरील या भाजपशी साधलेल्या जवळिकीचा फायदा करून घेऊ शकतील असे सगळेच बोलत आहेत . सांगली जिल्ह्यातील जवळपास ७ सहकारी साखर कारखान्यांवर जयंत पाटील यांचे वर्चस्व असले तरी सांगलीतील स्थानिक भाजपनेते जयंत पाटलांच्या विरोधात कधीच ‘ ब्र ‘ शब्दानेही बोलत नाहीत , याचेही अन्वयार्थ जो तो आपापल्या परीने लावतो आहे .
महत्वाचे म्हणजे जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ज्या तत्वांच्या आणि कारणांच्या पार्शवभूमीवर आधीच्या सर्वपक्षीय पॅनलच्या प्रयत्नातून अंग काढून घेताना भाजपला नाकारले होते. ती तत्वे आणि कारणे सांगलीत जयंत पाटलांना लागू होत नाहीत का ? , असा तेवढाच तर्कपूर्ण प्रश्न आता राष्ट्रवादीला राज्यभरात विचारला जाऊ शकणार आहे .. त्यातल्या त्यात जयंत पाटील मुरब्बी आहेत म्हणूनच त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. मोदी सरकारच्या चौकशांच्या राजकारणातून अजित पवारांनाही सोडले गेलेले नसताना जयंत पाटलांनी भाजपशी असे जुळवून घेणे त्यांच्या पक्षाच्या पातळीवर कसे सहन केले जाणार ? जळगावात तत्वाने नाकारलेले सांगलीत सोयीने उचलले जाणे कसे समर्थनीय ठरवणार ? , हा आता कळीचा मुद्दा ठरवला जाऊ शकतो , असे बोलले जाऊ लागले आहे .







