जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या समितीची, कर्मचाऱ्यांची बैठक गेली दीड महिने झाले अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी घेतली नाही. त्यामुळे योजनेशी संबंधित कामांना काही प्रमाणात खोळंबा होत असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना उपचारांसाठी राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनामार्फत आर्थिक मदत व्हावी यासाठी कार्यालय उघडण्यात आले आहे. पहिले अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या काळात योजनेचे कार्यालय हे आतील बाजूस होते. मात्र पुढील अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रुग्णांना व नातेवाईकांना योजनेची माहिती व्हावी यासाठी हे कार्यालय रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस मध्यवर्ती भागात आणले. येथे अद्ययावत सुविधा देऊन नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांची नेमणूक केली. फर्निचर, संगणक तसेच कर्मचारी भरतीदेखील केली.
रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना योजनेची पूर्ण माहिती देणे, कागदपत्रे जुळविण्यासाठी मदत करून आर्थिक प्रकरणे शासनाकडे दाखल करणे या कामांना गती यायला लागली. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेत होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेत होते. यामुळेच गेल्या सव्वा वर्षात योजनेच्या सक्षम कामकाजामुळे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळाला. २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनातर्फे योजनेच्या समिती व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला होता.
डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी एकतर्फी पदभार घेतल्यानंतर दीड महिन्यात मात्र या योजनेच्या कार्यालयाला येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. योजनेचे अध्यक्ष स्वतः अधिष्ठाताच असून सचिव म्हणून डॉ. मारोती पोटे आहे. डॉ. फुलपाटील यांनी पदभार घेतल्यापासून एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे रुग्णांच्या प्रकरणांमध्ये येणाऱ्या अडचणी, कार्यालयातील समस्या, कर्मचाऱ्यांच्या समस्या यांकडे गंभीर दुर्लक्ष होऊ लागले आहे. यामुळे प्रकरणे कमी होत असल्याचे काहीसे चित्र दिसून येत आहे. योजनेच्या कार्यालयाचे नुकतेच दिल्ली येथील “कॅग” ने दप्तर तपासणी केली आहे.
” योजनेची बैठक गेल्या दीड महिन्यात एकदा झालेली आहे. त्याला अधिष्ठाता, सदस्य सचिव, वैद्यकीय अधीक्षक, नोडल अधिकारी उपस्थित होते. आज योजनेचे कामकाज सुरु असून यंत्रणा कार्यरत आहे.”
-डॉ. मारोती पोटे, सदस्य सचिव, म. फुले जनआरोग्य योजना समिती.







