यावल (प्रतिनिधी) – कामावर गेलेला तालुक्यातील बोरावल येथील बेपत्ता तरुणाचा तापी नदीच्या पात्रात शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला आहे. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू असावा असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. योगेश देवराम शंखपाळ (वय ३६) असे मृत तरुणाचे नाव आहे. यावल पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

योगेश देवराम शंखपाळ हे शेळगाव बॅरेज येथे डंपरवर चालक म्हणून काम करतात. काल दि. २८ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्याची दुचाकी तापी नदीच्या किनाऱ्यावर लावून तेथुन दुसऱ्या किनाऱ्यावर जावून कामाला जात असे, अशी माहिती मिळाली आहे. गुरुवारी देखील योगेश कामाला निघालेला होता. संध्याकाळी तो परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली. सर्वत्र माहिती घेतली. मात्र तो मिळून आला नाही.
आज शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तापी नदीच्या पाण्यात दिसून आला. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. नातेवाईकांनी मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान. त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस कर्मचारी करीत आहे.







