जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन भवनात पार पडली.


रुग्णसेवेबद्दल सातत्याने तक्रारी येत असल्याने तसेच माध्यम प्रतिनिधींशी उद्धट वर्तणूक केल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत चांगलीच खरडपट्टी काढली. काम करता येत नसेल तर खुर्ची सोडा, रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा झाला तर कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री पाटील यांनी अधिष्ठाता फुलपाटील यांना दिला.

धरणगाव तालुक्यातील जांभोरा येथील महिला रुग्णास १५ दिवसापासून जेवण करण्यास अडचणी येत होत्या. घसा तपासण्यासाठी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले होते. त्यांना औषधी देऊन काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. कान नाक घसाचे डॉक्टरांनी दिवाळीनंतर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते. मात्र संबंधीत महिला रुग्णाने त्रास होत असल्याने काही दिवसांपासून जेवण केले नव्हते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असताना दाखल करण्यात आले नाही. परिणामी, त्यांची तब्ब्येत खालावली. कुटुंबीयांनी तातडीने खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे. महिला मृत्युच्या दारात असताना तिच्या शस्त्रक्रियेसाठी विलंब का होतो याचा जाब डॉक्टरांना नातेवाईकांनी विचारला होता.
यापूर्वी देखील रुग्णांच्या उपचारांविषयी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. अधिष्ठात्यांनी रुग्णालयात राउंड घेणे देखील बंद केले आहे. यामुळेच शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिष्ठाता फुलपाटील यांना धारेवर धरले. यापुढे रुग्णांच्या उपचारामध्ये हयगय झाली तर कारवाई केली जाईल अशी तंबी दिली. तसेच, माध्यमांच्या प्रतिनिधींना व्यवस्थित माहिती देत नाही, त्यांना बाहेर काढतात म्हणून देखील डॉ. फुलपाटील यांची खरडपट्टी काढली.
डॉ. फुलपाटील पहिल्यांदाच पालकमंत्र्यांसमोर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा एकतर्फी कार्यभार घेतल्यावर डॉ.मिलिंद फुलपाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची एकदाही भेट घेतली नव्हती. तसेच, पालकमंत्री हे रुग्णालयात दोन वेळ येऊन गेले तेव्हाही ते सुटीवर गेलेले होते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते पहिल्यांदाच पालकमंत्र्यांसमोर आले.







