जळगाव ( प्रतिनिधी ) – मित्रासोबत शहरात येताना दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्यावर तरूणाला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला ही घटना दुपारी गणेश कॉलनीतील गोकुळ स्वीट मार्टजवळ घडली. त्याचा साथीदार दुसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मयत तरूणाच्या नातेवाईकांनी आक्रोश केला होता. सौरभ बनवारीलाल तिवारी (वय-२२ , रा. महाविर नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. लिलाधर संजय काळे ( रा. कांचन नगर) हा तरूण गंभीर जखमी झाला आहे.
सौरभ तिवारी यांचे गांधी मार्केटमध्ये शुजचे दुकान आहे. महाविर नगरात आई, बहिण व लहान भावासोबत तो राहत होता . शुज दुकान चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता . आज दुपारी चुलत भावाला दुकानावर बसवून मु.जे. महाविद्यालय परिसारात जातो असे सांगून मित्र लिलाधर काळेसोबत दुचाकीने गेला काम आटोपून ते दुकानवर येण्यासाठी गणेश कॉलनीतील गोकूळ स्वीटमार्ट समोरून जात असतांना दुचाकी घसरली. तेवढ्यात मागून भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली सौरभ आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर लिलाधर काळे गंभीर जखमी झाला ट्रक जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलाचा मृतदेह पाहून सौरभच्या आईने हंबरडा फोडला होता.