यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चुंचाळे शिवारातून काल दुपारी बेपत्ता झालेली दोन भावंडे रात्री उशीरापर्यंत शोध घेऊनदेखील आढळून न आल्याने यावल पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चुंचाळे येथील गायरान परिसरात रवींद्र सावळे आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना रितेश आणि हितेश ही अनुक्रमे ५ आणि ६ वर्षांची मुले आहेत. बुधवारी आई-वडिलांसोबत ही दोन्ही मुले शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र दुपारी दोनपासून ती मुले दिसून न आल्याने त्यांचा परिसरात शोध घेण्यात आला.चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा दुपारपासून शोध घेण्यात येत असला तरी ते मिळून न आल्याने सावळे दाम्पत्य धास्तावले आहे.
रात्री उशीरापर्यंत मुलांचा शोध लागला नव्हता. यामुळे वडील रवींद्र सावळे ( वय ३५, रा. चुंचाळे) यांनी फिर्याद दिली. हितेश रवींद्र सावळे (वय ६) आणि रितेश रवींद्र सावळे (वय ५) या दोन्ही भावंडांना कुणी तरी फुस लाऊन अथवा अन्य कारणाने पळवून नेल्याचा भाग ५ गुरनं १८७/२०२१ भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो नि सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स पो उनि विजय पाचपोळे करत आहेत.