मुंबई ( प्रतिनिधी ) – आर्यन खान ड्रग्ज गदारोळात हॅकर मनीष भंगाळे याने आपल्याला डाटा हॅक करण्यासाठी पाच लाख रूपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. भंगाळे याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप केल्यानंतर त्याला कारागृहाची हवा खावी लागली होती.
इथिकल हॅकर मनीष भंगाळे याने आज आपल्याला पाच लाख रूपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला एका वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार, मनीष भंगाळेला भेटण्यासाठी जळगावला ६ ऑक्टोबरला आलोक जैन आणि शैलेश चौधरी आले होते. त्यांनी सीडीआरचं काम सांगितलं. काही नंबर सांगितले त्यातील एक नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये पूजा ददलानी म्हणून सेव्ह होता त्यांच्याकडे आणखी काही नंबर होते. त्यांनी आपल्याकडे एक व्हाट्सऍप चॅट आहे. ते मॉडीफाय करुन टाका, आम्ही जे कंटेट सांगू ते टाका, असं सांगितलं. त्यांच्या मोबाईलमध्ये जी फाईल होती ती आर्यन खान व्हॉट्सऍप चॅट या नावाने होती. त्यांनी प्रभाकर साईल नावाचे डमी सीमकार्ड काढून देण्यास सांगितला. यासाठी पाच लाख देऊ केले होते
मनीष भंगाळे म्हणाला की, त्यांनी मला आमीषे दाखविली. मला दहा हजार रुपये दिले. मी ते घेऊन निघून आलो. मी त्यांचे नंबर ट्रू कॉलरला चेक केले ते नाव सॅम डिसूजा म्हणून दिसलं. मी ही माहिती मुंबई पोलिसांना, केंद्रीय व महाराष्ट्र गृहमंत्रालयाला पाठवली असल्याचेही त्याने सांगितले
मनीष भंगाळे याने २०१६ साली मे महिन्यात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्या पत्नीने बोलणे केल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मध्यंतरी जळगाव येथे डाटा हॅक करून देण्याच्या प्रकरणात देखील त्याने ऐनवेळेस पोलीसांना माहिती दिली होती.