जळगाव ( प्रतिनिधी ) – सुविधा नसलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , रुग्णालय बंद करा अशी मागणी आज दिव्यांग समितीने जिल्हाधिकार्यांकडे केली आहे
येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय पूर्वीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आवारातच सुरू करण्यात आले येथे रूग्ण व दिव्यांगासाठी सुविधांची वानवा असून दिव्यांग रूग्णांना तपासणीसाठी पुणे , मुंबई , औरंगाबाद व अन्यत्र जावे लागते.दिव्यांगासह अन्य रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जीएमसी बंदच करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हा अपंग बांधव समितीतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले.
चार वर्षांपूर्वीच जिल्ह्याच्या मुख्यालयी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. परंतु रूग्णांना न्यूरो, बायोप्सी, ऍन्जिओप्लॉस्टी, एमआयआर, सोनोग्राफी, सीटीस्कॅन आदी सुविधा केवळ दुपारी २ वाजेपूर्वीच असून अन्य वेळा बंदच असतात. प्रशिक्षीत परिचारिका, अनुभवी वा प्रशिक्षीत डॉक्टर्स, तपासणी लॅबचे कर्मचारी संख्या पूरेशा प्रमाणात नसल्याने रूग्णांना सुविधा वेळेवर उपलब्ध होत नाहीत. कर्णबधीरांसाठी बायेस्टेस, मतिमंदासाठी आयक्यु टेस्ट, दिव्यांगांसाठी एमआयआर, दिव्यचक्षूंच्या नेत्र वा अन्य तपासणीसाठी खाजगी रूग्णालय वा मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी पाठवले जाते. वाहनतळासाठी जादा शुल्क द्यावे लागते. मुख्य प्रवेशव्दारावर व्हिल चेअर तसेच प्रतिक्षालयात पुरेशी बैठक व्यवस्था नाही. दिव्यांगासाठी नोंदणी करून कूपन देण्यात येवून दोन ते तीन महिन्यांनंतर तपासणीसाठी बोलावले जाते, दिव्यांगांना कुटुंबियांसह व नागरिकांना आर्थीक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. असे निवेदन जिल्हा अपंग बांधव समितीचे किशोर नेवे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.