चोपडा ( प्रतिनिधी ) – सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात शेतकरी संघटना एकवटल्या असून चोपडा तालुक्यात गुरुवारी ( २९ ऑक्टोबर ) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .
चोपडा तालुक्यातील शेतकरी संघटनांनी तहसीलदार आणि पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरु झाले आहे ते थांबवा . शेती पंपांचे वीज बिल माफ करा . यापुढे तरी अन्य राज्यांसारखे वीज बिल माफ करा . शेती पंपांची वीज बिल आकारणी किमान अशवशक्तीच्या आधारावर करावी . दुष्काळ व अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आलेले शेतकरी सक्तीच्या वीज बिल वसुलीमुळे राज्यातील शेतकरी आणखी अडचणीत आले आहेत अन्य राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात घरगुती वीज महाग आहे . घरातील वीज बिल भरणेही शेतकऱ्यांना शक्य नाही . वीज चोरणारे बिनधास्त आहेत आणि नियमित वीज बिल भरणाऱ्यांना मात्र वीज तोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत . सरकारकडून हंगामातील एकूण नुकसानीची भरपाई देणे शक्य नसेल तर किमान वीज बिल तरी माफ करावे या मागणीसाठी गुरुवारी ( २९ ऑक्टोबर ) चोपडा शहरातील चोपडा ते अंकलेश्वर महामार्ग आणि चोपडा ते धरणगाव मार्गावर व चोपडा तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.