जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील विसनजीनगरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर दरोडा टाकून तिजोरीच उचलून पळवून नेणाऱ्या टोळीचे २ म्होरके ठाणे , वर्ध्यातून जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात वर्धा येथून ताब्यात घेतलेल्या आरोपीला न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, तर ठाणे येथून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस आज जळगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर या दोघांपैकी शिवासिंग विरसिंग दुधाणी ( वय २८, रा. साईकृपा नगर, आंबेवली, कल्याण जि. ठाणे ) याला ठाण्यातून आणि विर मंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधाणी ( वय ४५ रा. नांदेड ) याला वर्धा येथून अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविणकुमार मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पो.काँ.समाधान पाटील, विकास पहुरकर, पो.ना. सलीम तडवी यांच्या पथकाने पहिल्या आरोपीला ठाणे येथून ताब्यात घेतले आहे. त्याला गुप्त माहिती वरुन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यासोबत या दरोड्यात सहभागी असलेले आणखी आरोपी आहेत . त्यांचा तपास पोलीस करीत आहेत . या आरोपींवर वर्धा ,यवतमाळ, भंडारा , जळगाव व ठाणे येथे दरोड्यांचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
वर्धा येथू आरोपी विर मंगलसिंग दुधाणी याला न्यायालयात हजर केले असता याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याआरोपींच्या विरोधात ६ जुलैरोजी दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक घनश्याम पंडित सोनार ( रा – तुळजाईनगर , कुसुबा , जळगाव ) यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती . या आरोपींच्या ४ जणांच्या टोळीने या संस्थेच्या कार्यालयात झोपलेल्या फिर्यादीला धमकावून संस्थेची तिजोरी उचलून नेली होती त्या तिजोरीत त्यादिवशी अडीच लाख रुपये असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले होते तेंव्हापासून पोलीस या टोळीच्या मागावर होते तिजोरीसह २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गु र न २९९ / २०२१ भा द वि कलम ४५८ , ३९२ ३४ नुसार दाखल करण्यात आला होता.







