जळगाव (प्रतिनिधी) – वाघनगर परिसरातील रहिवाशी अनिता हेमराज सोनवणे यांना त्यांची पाळीव कुत्री खांबाला बांधत असतांना चावल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. चावा घेतलेल्या या पाळीव कुत्रीला देखील रुग्णालयात आणल्याने या कुत्रीने लक्ष वेधून घेतले होते.
अनिता सोनवणे (वय ३५) दुपारी त्यांच्या घरामध्ये काम करीत होत्या. त्याच वेळेला त्यांच्या पाळीव कुत्री ‘डॉली’ला पट्टा बांधण्यासाठी त्या अंगणात आल्या. पट्टा बांधत असताना आणखी एका दुसऱ्या पाळलेल्या कुत्रीने डॉलीवर भुंकण्याचा व अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डॉली बिथरली आणि घाबरून तिने पट्टा बांधत असलेल्या मालकिणीच्या डाव्या हाताच्या पंजाला चावा घेतला. मालकीण अनिता सोनवणे जखमी झाल्या. कुटुंबीय व शेजाऱ्यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. सोबत डॉलीला देखील आणले होते. रुग्णालयाच्या आवारात कुत्रीला बांधून ठेवल्यानंतर तिने भुंकून भुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलेच्या हातावर औषध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. संदीप बोरसे, सीएमओ डॉ. प्राची सुरतवाला यांनी उपचार केले.