मुंबई ( वृत्तसंस्था ) – पत्नीची हत्या केल्याच्या गुन्ह्यात 2000 मध्ये दोषी ठरलेला प्लास्टिक सर्जन रॉबर्ट बेरेनबॉमने हत्येनंतर पत्नीचा मृतदेह विमानातून खाली फेकून दिल्याची कबुली दिली. जवळपास तीन दशकं निर्दोष असल्याचा आव आणल्यानंतर बेरेनबॉमच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश झाला.
परिस्थितीजन्य पुराव्यामुळे अनुभवी पायलट रॉबर्ट बेरेनबॉमला दोषी ठरवण्यात आले. डिसेंबर 2020 च्या पॅरोल बोर्डाच्या सुनावणीदरम्यान थंड डोक्याने कबुलीजबाब देताना रॉबर्टची जन्मठेपेची 20 वर्षांची शिक्षा भोगून झाली होती. 1985 मध्ये रॉबर्टची पत्नी गेल काट्झ बेपत्ता झाल्यानंतर त्याने पहिल्यांदाच आपला गुन्हा कबूल केला होता. विमानातून खोल समुद्रात पडल्यानंतर गेल काट्झचा मृतदेह कधीच सापडला नाही.
“तिने माझ्यावर ओरडणे थांबवावे, अशी माझी इच्छा होती. याच उद्देशाने मी तिच्यावर हल्ला केला.” अशी कबुली रॉबर्ट बेरेनबॉम याने दिली. “मी तिचा गळा दाबला. त्यानंतरही मी विमान चालवत राहिलो. काही वेळाने समुद्राच्या वरुन जाताना मी विमानाचा दरवाजा उघडला आणि तिचा मृतदेह बाहेर टाकला” मी बायकोची हत्या केली कारण त्यावेळी मी “अपरिपक्व” होतो आणि “रागावर नियंत्रण कसं ठेवावं, हे मला समजत नव्हतं” असं लंगडं समर्थन त्याने केलं.
बेरेनबॉमच्या कबुलीने प्रत्येकालाच धक्का बसला, कारण त्याच्या 2000 च्या खून खटल्यात न्यायालयात वकिलांनी नेमका हाच सिद्धांत मांडला होता. बेरेनबॉम तुरुंगात असून पुढील पॅरोल सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे.