जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयाची तपासणी करण्यासाठी दिल्ली येथील “कॅग”चे लेखापरीक्षक येऊन गेले. त्यांनी दोन दिवस योजनेसंदर्भात होणाऱ्या कार्यवाहीची कसून तपासणी केली.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार व्हावे याकरिता राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनारोग्य योजना लागू आहे. त्याचे रुग्णालयाच्या मध्यवर्ती भागात कार्यालय आहे. या कार्यालयाकडून रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता मदत केली जात आहे. या कार्यालयाला २६ जानेवारी २०२० रोजी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले आहे.
योजनेची कार्यवाही योग्य रीतीने होते काय, रुग्ण किंवा नातेवाईकांच्या काही तक्रारी आहेत का, कर्मचाऱ्यांच्या समस्या, लेखा परीक्षण, इत्यादी बाबींवर त्यांनी योजनेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी योजनेचे अध्यक्ष तथा अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांची भेट घेतली. केंद्र सरकारच्या या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कामकाजाबाबत सर्व चाचपणी केली. किती कर्मचारी काम करतात, त्यांना पगार किती, ऑफिस कसे आहे, कर्मचाऱ्यांची तत्परता हेदेखील त्यांनी जाणून घेतले.
“कॅग”च्या अधिकाऱ्यांनी काही नातेवाईक व रुग्णांना प्रत्यक्ष व फोनद्वारे विचारणा केली. योजनेचा तुम्हाला लाभ झाला काय, कसा झाला, तुम्ही योजनेच्या बद्दल समाधानी आहे याबाबत माहिती घेतली. कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांना या समितीच्या भेटी सुरु आहे. तेथेही लेखापरीक्षण केले जात आहे. जिल्ह्यातील ३४ रुग्णालये या योजनेअंतर्गत येतात.