औरंगाबाद ( प्रतिनिधी )- पैठण तालुक्यातील ताोंडोळी भागातील शेतवस्तीवर मंगळवारी रात्री आठ दरोडेखोरांनी पुरुषांना बांधून ठेवत दोन महिलांवर बलात्कार केला. तोंडोळी शेतवस्तीवर येण्याआधीही दरोडेखोरांनी लोहगावच्या शेतवस्तीवर हल्ला करून रोकड लुटल्याचेही समोर आले तेथील पुरुषांनाही मारहाण केली.

आता तपास करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. तोंडोळी येथील शेतवस्तीवर तीन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कुटुंब राहण्यास आले होते. यात तीन पुरुष व चार महिला होत्या. दरोडेखोरांनी या कुटुंबावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली.कुटुंबातील पुरुषांना बाजूच्या खोलीत हातपाय बांधून कोंडले, बाहेर एकाच्या गळ्याला चाकू लावून चारपैकी दोन महिलांवर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. यातील पीडिता 31 आणि 32 वर्षीय असून, त्यांना दरोडोखोरांनी घराच्या बाजूला नेत अत्याचार केले. घरातील पुरुषांना शस्त्रांचा धाक दाखवून आधीच बांधून ठेवले हाेते, त्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. एकाने मुकाबला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. तोंडोळी येथील या घटनेत दरोडेखोरांनी रोख 36 हजार आणि दागिने लंपास केले.
दोन्ही पीडितांची घाटीत तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यात आले. पीडितांची प्रकृती स्थिर आहे. पीडितांवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले असून नियमानुसार सर्व अंगाने तपासणी करून सखोल अहवाल पोलिसांना देण्यात आल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले.
विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, पोलिस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, बिडकीनचे सहायक निरीक्षक संतोष माने हे अधिकारी रात्री उशिरापर्यंत बिडकीन येथे ठाण मांडून तपासावर लक्ष ठेवून होते. 11 पथके दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना झाली. यात जालना, बीड येथील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांत पूर्वी काम केलेले व बदलून गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही तपासात सहकार्य घेतले जात आहे.
शेकटा रोडवरील शेतात पाण्याच्या हौदाजवळ मोबाइल, कुऱ्हाड, नकली सोन्याचे दागिने व दरोडेखोरांचे बदललेले कपडे आढळून आले आहेत.तोंडोळीनंतर दरोडेखोरांनी लोहगावातील शेतवस्तीवर मारहाण करून लूटमार केली. तीन दुचाकींवर आलेल्या दरोडेखोरांनी जाताना येथील कुटुंबाची एक दुचाकीही नेली. या घटनेत लूटमारीपेक्षा पाशवी अत्याचाराच्या घटनेने सर्वांचा थरकाप उडाला.







