जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार, खासदारांसह दिग्गज उमेदवारांच्या अर्जांवर हरकती आल्या होत्या. हरकतींवर जिल्हा उपनिबंधक तथा निवडणुक निर्णयाधिकारी संतोष बिडवई यांनी सुनावणी घेतली. सुनावणीनंतर उद्या (दि. २१) निवडणुकीतुन बाद झालेले व रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांची यादी उद्या ११ वाजता जाहीर केली जाणार असल्याचे बिडवई यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी २७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज या अर्जांची छाननी झाली .
या प्रक्रियेदरम्यान आमदार-खासदार यांच्यासह दिग्गज उमेदवारांच्या अर्जांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हरकती घेतल्या. या हरकतींवर जिल्हा उपनिबंधक तथा निवडणुक अधिकारी संतोष बिडवई यांनी सुनावणी घेतली. यावेळी निरीक्षक प्रवीण महाजन उपस्थित होते.
खासदार उन्मेश पाटील व रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, संतोष चौधरी, घनश्याम अग्रवाल, माजी राज्य मंत्री गुलाबराव देवकर, अॅड. रविंद्र पाटील, आ.किशोर पाटील, राजीव देशमुख यांच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांची कमी पडलेले कागदपत्रे सादर करण्यासाठी चांगलीच भांबेरी उडाली. उमेदवारांनी तातडीने आपल्या वकीलांना पाचारण करून, सुनावणी प्रक्रियेत आपली बाजू मांडली आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बाजू ऐकून आपला निकाल राखीव ठेवला आहे. त्यामुळे हरकती घेण्यात आलेल्या उमेदवार कमालीचे काळजीत दिसून आले. जळगाव विकास सोसायटी मतदारसंघात आमदार राजूमामा भोळे व महापौर जयश्री महाजन यांच्यात लढत रंगणार आहे. यासाठी दोन्ही उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याआधी बुधवारी आमदार राजूमामा भोळे यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला असून, यावर सुनावणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली.







