चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील खेडगावचे सुपुत्र गौरव साळुंखे तालुक्यातील पहिले जिल्हाधिकारी ठरले आहेत . त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी कृतज्ञतेची भावना म्हणून आमदार निधीतून खर्च करून गौरव साळुंखे यांच्या माता-पित्याच्या नावाने अभ्यासिका उभारण्याची घोषणा आज केली .
खेडगावाच्या मातीने केवळ चाळीसगावच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात लौकिक मिळविणारी व्यक्तीमत्वे दिली, आज याच मातीच्या गौरव साळुंखे या सुपुत्राने भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम व देशात १८२ रँक मिळवत यश प्राप्त केले. याच गावाचे मयूर सूर्यवंशी हे आयएएस , परिमल साळुंखे हे आरएफओ , सचिन साळुंखे एपीआयपदी नियुक्त झाले. चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या जिल्हाधिकारी पदाचा मान गौरव साळुंके यांनी मिळवला ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आज खेडगाव येथे आयोजित हा नागरी सत्कार एकट्या गौरव साळुंखे यांचा नसून त्यांना घडविणाऱ्या आई-वडील-बंधू आदी पूर्ण परिवाराचा हा सत्कार असल्याची भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी खेडगाव येथे सत्कार सोहळ्यात व्यक्त केली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व खेडगाव येथील नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी गौरव साळुंखे यांच्या आई – वडिलांच्या नावाने आमदार निधीतून सुसज्ज अभ्यासिका उभारेल अशी घोषणा देखील त्यांनी केली.
खेडगाव येथे गौरव साळुंखे यांच्यासह मयूर सूर्यवंशी, परिमल साळुंखे, सचिन साळुंखे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार उन्मेष पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी साळुंखे, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेश बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सरदार राजपुत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, मार्केट माजी संचालक विश्वजीत पाटील, माजी जि.प.सदस्य साहेबराव साळुंखे, रावसाहेब साळुंखे, पंकज साळुंखे, प्रफुल्ल साळुंखे यांच्यासह खेडगाव पंचक्रोशीतील सरपंच, विकासो सदस्य, आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार चव्हाण म्हणाले की, राजकारणी म्हणून आम्हाला दर पाच वर्षांनी जनतेपुढे परीक्षेला सामोरे जावे लागते मात्र प्रशासकीय सेवेतील अधिकारी हे एकदा परीक्षा देऊन आपले पूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी देतात. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जिल्हाधिकारीपद गौरव साळुंखे यांना मिळाल्याने त्यांच्यापुढे अनेक संधी आहेत. जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी मोठी असते. एक शिक्षकाचा मुलगा जिल्हाधिकारी होतो ही मोठी गोष्ट आहे, ते आपल्या कार्यकाळात राज्याच्या मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचतील व चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी योगदान देतील हा मला विश्वास आहे. क्षेत्र कोणतेही असो मेहनतीला पर्याय नाही,
या नागरी सत्कार सोहळ्यात गौरव साळुंखे व त्यांचे आई – वडील रविंद्र साळुंखे व सौ.सुरेखा साळुंखे, विकास सुर्यवंशी व सौ.छाया साळुंखे, सचिन साळुंखे, सुरेंद्र साळुंखे, निंबाजी साळुंखे, दत्तात्रय साळुंखे यांचाही सत्कार करण्यात आला .
खेडगावचे सुपुत्र, ज्यांनी केवळ खेडगावच नव्हे तर चाळीसगाव तालुका, जळगाव जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला (चौकट)
जळगाव जिल्ह्यातील नामांकित नूतन मराठा संस्थेचे संस्थापक स्व.केशवराव साळुंखे व माजी आमदार टि टी साळुंखे,जयंतराव साळुंखे , शहाजीराव साळुंखे
.भा.रा.आबा पाटील , जे जे चौधरी , किसन रावसाहेब यांच्या स्मृतींना सर्व मान्यवरांनी यावेळी उजाळा दिला .