पहिल्याच दिवशी अकरा जणांना लाभ
जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अखेर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. मंगळवारी १२ ऑक्टोंबर रोजी पहिल्याच दिवशी अकरा नागरिकांचे डोळ्यांचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून शस्त्रक्रिया बंद होत्या.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मार्च महिन्यापासून नेत्र कक्षामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद होत्या. त्यानंतर २२ जुलै रोजी रुग्णालय कोरोनाविरहीत आजारांसाठी खुले झाल्यावर नेत्र शस्त्रक्रिया होण्यासाठी अनेकांनी नोंदणी केली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांच्या उदासीनतेमुळे नेत्र कक्षाच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण राहिले होते. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला खरमरीत पत्र लिहिली. या पत्रांचा परिणाम होऊन नेत्र कक्षाच्या दुरुस्तीला आणि रंग कामाला सुरुवात झाली होती.
गेल्या महिनाभरापासून या कामाकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होते. नेत्र कक्षाचे काम संथगतीने सुरू होते. अखेर हा संथपणा संपून सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी सुसज्ज झाला. रुग्णांच्या नोंदणी नुसार मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी अकरा नागरिकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया नेत्रशल्यचिकित्सा विभागातर्फे करण्यात आल्या. शस्त्रक्रिया व्हाव्या यासाठी गेल्या अडीच महिन्यात अनेक जणांनी नेत्रशल्यचिकित्सा विभागात नोंदणी केली होती. मात्र नेत्र कक्षाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे अनेकांनी इतर ठिकाणी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या.
सर्व शस्त्रक्रियेनंतर अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी माहिती घेतली. प्रसंगी विभाग प्रमुख डॉ. प्रसन्ना पाटील यांनी शस्त्रक्रिया व त्या बाबतची माहिती अधिष्ठाता यांना दिली. शस्त्रक्रिया डॉ. प्रसन्ना पाटील, डॉ. सुप्रिया पेंडके, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केल्या. त्यांना डॉ. संजय धुमाळे, डॉ.निखिलेश शेट्टी, डॉ. तुषार बोंबटकर,डॉ. सुप्रिया सोनवणे, अधिपरिचारिका जोगी, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.