एरंडोल ( प्रतिनिधी ) – पुण्यात साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या आणि मूळच्या एरंडोल येथील रहिवाशी असलेल्या तरुणाचे काल पुण्यात अपघाती निधन झाले .
शैलेंद्र गणसिंग राजपुत ( वय ४२ वर्षे रा. लक्ष्मी नगर, एरंडोल ) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे ते हल्ली पुण्यात साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करीत होते बुधवारी रात्री ११.३० वाजता पुण्यातील डांगे चौकात त्यांच्या दुचाकीला डंपरचा धक्का लागून डंपरच्या मागच्या चाकात आल्यामुळे जागीच दूर्देवी अपघाती मृत्यू झाला. त्यांना फिनिक्स हाॅस्पिटल व नंतर सरकारी हाॅस्पिटल, औंध येथे आणल्यानंतर रात्री १२.४५ ला मृत घोषित करण्यात आले.
स्व. शैलैंद्र हे १ वर्षांपूर्वीच मलेशियातील नोकरी सोडून पुण्यात एका कंपनीत काम करत होते. नुकतेच ३ दिवसांपुर्वी एरंडोलला आई वडील व मित्र परिवारास भेट देवून आलेले होते. त्यांचा जनसंपर्क अफाट होता, मित्रांना नेहमी बांधून ठेवणारा एक चांगला मनमिळाऊ मित्र असल्यामुळे पुणे व एरंडोल येथील मित्र परिवार हळहळ व्यक्त करत आहे. स्व शैलेंद्र हे गणसिंग रामसिंग राजपुत (माजी ग्रामसेवक) यांचे एकुलते एक चिरंजीव होते, त्यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. अपघातग्रस्त डंपरच्या ड्रायव्हरने रात्रीच वाकड पोलीस स्टेशन येथे शरणागती पत्करलेली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.