मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये , अभिमत विद्यापीठे , स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे आणि सलंग्न महाविद्यालये आता कोरोनानन्तर २० ऑक्टोबरपासून नियमित सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.
याबद्दल राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की , महाविद्यालये ५० टक्के क्षमतेने किंवा कसे सुरु करायची याचा निर्णय विद्यापीठांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून त्यांच्या पातळीवर घ्यावा . कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गात प्रत्यक्ष बसू द्यावे . प्रतिबंधित क्षेत्रातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेताना आरोग्यविषयक उपलब्ध पायाभूत सुविधांचा विचार केला जावा . जे विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाही त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी , ज्या विदयार्थ्यांनी कोरोना लस घेतलेली नाही त्यांच्या व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सुविधा उपलब्ध करून घ्यावी.