जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २६ पैकी १६ डॉक्टर रुजू होणार ; १९ पाठ्यनिर्देशिकांचीही निवड

जळगाव (प्रतिनिधी) : राज्य शासनातर्फे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून विविध वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवा देण्यासाठी अर्ज मागवले होते. यात जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध विभागाच्या एकूण २६ जागा होत्या. यापैकी १६ बंधपत्रित उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे. तसेच, १९ पाठ्यनिर्देशिका (ट्यूटर) देखील जळगावात येणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थी एमबीबीएसचे पदव्युत्तर शिक्षण घेतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना एक वर्षाची नियमित सेवा वैद्यकीय महाविद्यालयात देणे बंधनकारक असते. त्यानुषंगाने राज्य शासनाने रिक्त जागा जाहीर करून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. यात जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २६ जागा रिक्त होत्या. मंगळवार दि. १२ ऑक्टोबर रोजी या विविध विषयातील बंधपत्रित उमेदवारांची नावे व त्यांच्या सेवा द्यायच्या रुग्णालयांची नावे जाहीर केली. या उमेदवारांना ८ दिवसात रुजू होणे बंधनकारक आहे.
जळगावला औषधशास्त्र विभागात ५ पैकी ३, शल्यचिकित्सा विभागात ४ पैकी ४, नेत्रशल्यचिकित्सा विभागात २ पैकी २, क्ष किरण विभागात ३ पैकी १, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात ३ पैकी २, बधिरीकरण विभागात ३ पैकी ३, छातीरोग विभागात १ पैकी १ बंधपत्रित उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. तर पाठ्यनिर्देशिका (ट्यूटर) म्हणून १९ जागांमध्ये फिजिऑलॉजिचे २, औषधशास्त्रचे ३, सूक्ष्मजीवशास्त्रचे ३, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागात ४, विकृतीशास्त्र विभागात ५, जीवरसायनशास्त्र विभागात २ जणांचा समावेश आहे.







