रुग्णालयाच्या गेटवर फलक लावावा ; दिपककुमार गुप्तांचे अधिष्ठातांना उपरोधिक विनंती पत्र


जळगाव ( प्रतिनिधी ) “नागरिकांनी केवळ कार्यालयीन वेळेतच आजारी पडावे, त्यानंतर स्वतःच्या जबाबदारीवर पडावे. कार्यालयीन वेळ समाप्त झाल्यावर बरे होऊन आपल्या घरी जावे” असा फलक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) गेटवर लावावा असे उपरोधिक निवेदन सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांना दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यानाही याबाबत गुप्ता यांनी पत्र दिले आहे. या निवेदनामुळे रुग्णालयाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांच्या कारभाराविषयी नाराजी वाढतच चालली आहे.
अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी महिनाभरापूर्वी १३ सप्टेंबर रोजी एकतर्फी पदभार घेतला. त्यानंतर त्यांच्या कारभाराविषयी जनतेतून, लोकप्रतिनिधींमधून तक्रारी वाढू लागल्या आहेत. आता सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी ९ ऑक्टोबर रोजी रात्री गंभीर रुग्णाच्या उपचाराविषयी डॉक्टर लक्ष देत नाही म्हणून अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांना फोन केला होता. त्यावेळी, डॉ. फुलपाटील यांनी, “कोणत्याही वेळी फोन करता काय, कार्यालयीन वेळेतच फोन करीत जा ” असे अजब उत्तर दिले होते. याबाबतची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. त्यानंतर डॉ. फुलपाटील यांच्या बेपर्वा कारभाराविषयी जनतेत असलेल्या नाराजीत आणखीन भर पडली होती.
गंभीर असलेल्या रुग्णांना जर तत्काळ उपचार मिळत नसतील आणि अधिष्ठाता जर मदत करण्याचे सोडून बेपर्वा उत्तरे देत असतील तर अशा अधिष्ठातांचे करायचे काय ? असा सवाल निर्माण झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी एक उपरोधिक निवेदनच तयार करून डॉ. फुलपाटील यांना दिले आहे.
निवेदनात काय विनंती केली आहे ?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर रुग्णांना २४ तास तत्काळ सेवा देणे बंधनकारक आहे. त्यासाठी शासकीय अनुदान खर्च होत असते. काही गंभीर अडचणी आल्या तर अधिष्ठातांना संपर्क करता येतो. यापूर्वीचे पहिले अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे व द्वितीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे नागरिकांच्या समस्या सोडवीत होते. मात्र डॉ. फुलपाटील यांच्या काळात तर अजब-गजब अनुभव येत आहेत. त्यामुळे आपणाला विनंती आहे की, प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपण लोकांना माहिती द्यावी की, रुग्णालयात येणारे रुग्णांनी फक्त कार्यालयीन वेळेतच आजारी पडावे. कार्यालयीन वेळ संपल्यावर आपल्या घरी जावे. कार्यालयीन वेळेनंतर स्वतःच्या जबाबदारीवर आजारी पडावे. कोणी रुग्ण मृत्यूच्या दारात असेल तर त्याने कार्यालयीन वेळ सुरु होण्याची वाट पाहावी. आपत्कालीन स्थिती असली तरीही कार्यालयीन वेळेनंतर अधिष्ठातांना कॉल करू नये. तसेच अधिष्ठातांनीही फक्त बेसिक पगारच घ्यावा. बाकी जे “अलाउन्स” असेल ते शासकीय कोषागारात जमा करावे अशी विनंती दिपककुमार गुप्ता यांनी केली आहे.







