पॅरिस ( वृत्तसंस्था ) – फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये तीन लाख ३० हजार मुले ७० वर्षांमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडली आहेत अशी माहिती एका अहवालात आढळून आली आहे. पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एवढ्या प्रमाणात अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

जे मुलांवर घाणेरडी नजर ठेवतात, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात त्यांना पीडोफाइल म्हणतात. १९५० पासून फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये हजारो पीडोफाइल सक्रिय होते. फ्रान्सच्या चर्चमध्ये बाल लैंगिक शोषणाच्या तपासात गुंतलेल्या स्वतंत्र आयोगाने ही माहिती दिली आहे.
अहवाल जारी करणारे आयोगाचे अध्यक्ष, जीन – मार्क सॉवे यांनी माहिती दिली आहे. “वैज्ञानिक संशोधनाच्या आधारावर या अनुमानात फादर तसेच चर्चमध्ये सामील नसलेल्या धर्मगुरूंनी केलेल्या गैरवर्तनांचा समावेश आहे. यामध्ये सुमारे ८० टक्के पुरुष पीडित आहेत. हे खूपच भयंकर आहे. लैंगिक शोषण झालेल्या सुमारे ६० टक्के पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या भावनिक किंवा लैंगिक जीवनात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते,” असे सॉवे म्हणाले.
स्वतंत्र आयोगाने तयार केलेल्या २,५०० पानांच्या अहवालाने इतर देशांप्रमाणेच फ्रान्समधील कॅथोलिक चर्चने लपवलेला हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. बाल लैगिंक अत्याचार करणाऱ्या ३,००० लोकांमध्ये दोन तृतीयांश धर्मगुरु होते जे त्या काळात चर्चमध्ये काम करत होते. पीडितांच्या एकूण आकडेवारीमध्ये पुजारी आणि इतर धर्मगुरुंनी गैरवर्तन केलेल्या अंदाजे २१६,००० लोकांचा समावेश आहे.
प्रति अत्याचार पीडितांचे हे प्रमाण विशेषतः फ्रेंच समाजासाठी, कॅथोलिक चर्चसाठी भयानक आहे. आयोगाने अडीच वर्षे काम केले. पीडितांचे आणि साक्षीदारांचे ऐकणे आणि १९५० च्या दशकात चर्च, न्यायालय, पोलीस आणि माध्यमांचा अभ्यास केला आहे. तपासाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलेल्या हॉटलाईनला कथित पीडितांकडून किंवा जे पीडितांना ओळखतात अशा लोकांचे ६,५०० कॉल्स आले.
गैरप्रकार कसा रोखता येईल याविषयी आयोगाने ४५ शिफारसी जारी केल्या आहेत. कॅनन कायद्यात सुधारणा करणे. व्हॅटिकन चर्चचा वापर करण्यासाठी कायदेशीर संहिता आणि पीडितांना ओळखण्यासाठी आणि भरपाईसाठी धोरणांना प्रोत्साहन देणे यामध्ये समावेश आहे.







