नाशिक ( प्रतिनिधी ) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची उत्साहात तयारी सुरू आहे. नवरात्र काळात हे मंदिर 24 तास खुले राहणार आहे.मात्र दर्शनासाठी कडक नियम करण्यात आले आहेत.

नवरात्रोत्साव काळात भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे. नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरविण्यास बंदी असेल आणि गडावर खासगी वाहनांनाही परवानगी नाही . नांदुरीवरून जाण्यासाठी एसटीची व्यवस्था आहे.
नवरात्रोत्सव काळात तसेच कोजागरी पौर्णिमेलाही 18 आणि 19 ऑक्टोबरला खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये पन्नास टक्के प्रवासी बसवून वाहतूक सुरू राहील. नांदुरी येथील बुथवरून ऑनलाइन पास शक्य असेल तरच मिळेल. पायी दर्शन करण्यासाठी बारा ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडच्या नियमानुसार या काळात फेनिक्यूलर ट्रॉली सुरू राहणार आहे. त्यात फेनिक्यूलरमधील भाविकांना 30 टक्के तर पायरीचे दर्शन घेणाऱ्यांना भाविकांना 70 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषतः भाविकांनी बसचा वापर करावा. जास्त गर्दी टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. सिन्नर आणि निफाड तालुक्यामध्ये रुग्णांची वाढ सातत्याने सुरू आहे. एकीकडे सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना शून्यावर जायला तयार नाही. कोरोना नियमांचे पालन सध्या कुठेही होताना दिसत नाही. मोठेमोठे खासगी कार्यक्रम जिल्ह्यात होताना दिसतायत. एखाद्या कार्यक्रमाला जेवणावळीसाठी फक्त शंभर जणांच्या उपस्थितीची परवानगी असेल, तर नागरिक दुपारी बारापर्यंत शंभर आणि सायंकाळी शंभर जणांना बोलवातयत. प्रत्येक नियमाला काही ना काही पळवाट आहे. अनेक जण मास्क घालत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या काही केल्या कमी व्हायला तयार नाही. हे पाहता नवरात्रोत्सवात कडक खबरदारी घेणे सुरू आहे.







