जळगाव ( प्रतिनिधी ) – कोरोना टाळेबंदीनतर आरोग्यविषयक सुविधांसाठी उद्योजकांकडे शाळांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत मागत फिरायचे की शिकवण्याचे काम करायचे असा प्रश्न भाजप शिक्षक आघाडीने विचारला आहे

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे बंद असणाऱ्या राज्यभरातील शाळा सुरु होणार आहेत. शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मात्र शासनाने हात झटकून सर्व जवाबदारी शाळांवर टाकली आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता शिकवावे कि मदत मागण्यासाठी कंपन्यांच्या दारी फिरावे ? असा प्रश्न भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रवीण जाधव यांनी शासनाला विचारला आहे
आता तरी शासनाने तातडीने शाळांना विशेष आर्थिक निधी पुरवावा याबाबत अर्थमंत्री यांना मागणी केली आहे. शाळा सुरु करतांना प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरु करावे, फॅन, सॅनीटायझर, ऑक्सिमिटर, थर्मोमीटर, मास्क, औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने केल्या आहे. त्यामुळे शाळांसमोर आर्थिक संकटे उभे राहिली आहे. अनेक अनुदानित संस्था तसेच शाळांना वेतनेतर अनुदान दिलेले नाही. कित्येक शाळा विनाअनुदानित असल्यामुळे आर्थिक संकटात आहेत.
शासनाकडे हक्काचा पी.एफ. मागून सुद्धा मिळत नाही. वैद्यकीय देयक मिळत नाहीत. असे असतांना आता आम्ही तुमच्या आदेशाने शिक्षक व आमच्या शाळा कंपन्यांकडे सीएसआर निधी मागूच, पण ते कधी देतील का ?. कि शाळा तशाच सुरु कराव्या लागतील, असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे. असे या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर प्रवीण जाधव, दुष्यंत पाटील, संदीप घुगे, संजय वानखेडे, के. एस. पाटील, किरण पाटील, विजय गिरणारे, सतीश भावसार, आर. एल. निळे, एन. आर. दानी आदींच्या सह्या आहेत







