भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कजगाव येथील रहिवासी अजबसिंग पाटील यांच्या कजगाव शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने पाण्याची मोटार चोरून नेल्याची घटना आज घडली.

अजबसिंग पाटील यांचे चिरंजीव निळसिंग पाटील सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेल्यावर मोटार चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आधीच शेतकरी विविध संकटांनी अडचणीत असताना आता अतिपावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यातच चोरीच्या घटनेने शेतकरी प्रचंड व्यथित झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरीच्या घटनेचा त्वरित तपास करून चोरट्यास जेरबंद करावे अशी मागणी होत आहे. ह्याच शिवारात यापूर्वीही अशा चोरीच्या घटना घडल्या होत्या, मात्र अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर भामट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.







