नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल हेल्थ मिशन जाहीर केले.

पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या पायलट प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यानंतर सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना राबवण्यात आली. आता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण द्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनला राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झाला आहे.
आता देशभरातील रुग्णालयांचे डिजिटल आरोग्य उपाय एकमेकांशी जोडले जातील. देशवासीयांना आता डिजिटल हेल्थ आयडी मिळेल. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य रेकॉर्ड डिजिटल संरक्षित केले जाईल. देशातील सर्व रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा, औषधाची दुकाने देखील नोंदणीकृत केली जातील. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर देणारे मॉडेल विकसित केले जाईल. डिजिटल हेल्थ आयडी द्वारे, रुग्ण स्वतः आणि डॉक्टर देखील आवश्यक असल्यास जुन्या नोंदी तपासू शकतात. आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी वैद्यकीय शिक्षणात अभूतपूर्व सुधारणा होत आहेत. 7-8 वर्षांच्या तुलनेत आज देशात अधिक डॉक्टर आणि पॅरामेडिकल मनुष्यबळ तयार केले जात आहे. कोरोना काळात टेलिमेडिसीनचा अभूतपूर्व विस्तारही झाला आहे. 130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाइल ग्राहक, सुमारे 800 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते, सुमारे 43 कोटी जन धन बँक खाती, जगात कुठेही इतकी मोठी कनेक्टेड यंत्रणा नाही. ही डिजिटल पायाभूत सुविधा भारतीय नागरिकांना जलद, पारदर्शक पद्धतीने सेवा पुरवत आहे.







