जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवसेनेच्या युवती सेना जामनेर तालुकाध्यक्षपदी स्नेहल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युवतीसेनाच्या विस्तारासाठी युवासेना कोअर कमिटी सदस्य शितल देवरुखकर-शेठ या जिल्हा दौर्यावर होत्या.त्यांनी स्थानिक युवतींचे प्रश्न जाणुन घेतले.पक्ष वाढीसाठी उपाययोजना सांगत तरुणींना मार्गदर्शन केले.
यावेळी युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे व सचिव वरूण सरदेसाई यांच्या सुचनेनुसार शितल देवरुखकर शेठ यांनी युवतीसेना जामनेर तालुका प्रमुख पदी कु.स्नेहल पाटील यांची नियुक्ती केली. स्नेहल पाटील या नांद्रा प्र लो ग्रामपंचायतीला निवडुन आलेल्या जिल्ह्यात सर्वात कमी २१ वर्ष वयाच्या ग्रा.पं.सदस्य असुन बीएस्सी झुलॉजी शिक्षण घेत आहेत.
जामनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील तरुणीला हक्काचं व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरा पर्यंत पोहचवुन युवतींना एक दिशा मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध असेल असे स्नेहल पाटील यांनी सांगितले.
नियुक्ती पत्र देतांना युवासेना युवती विस्तारक धनश्री कोलगे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे पाटील, सरिता माळी-कोल्हे, डॉ.प्रियंका पाटील उपस्थित होते.
स्नेहल पाटील यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. चंद्रकांत पाटील, आ. लता सोनवणे, महापौर जयश्री महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील यांनी अभिनंदन केले.







