जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यामध्ये २७ ते २९ सप्टेंबर रोजी पंचायत राज समिती दौरा करणार आहेत. या समितीच्या नावाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून आर्थिक वसुली होत असल्याचा आरोप करीत दोषींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश कडू भोळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.

जिल्ह्यातील विविध विभागात पंचायत राज समिती २७ ते २९ सप्टेंबर रोजी दौरा करणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून समितीच्या नावाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पहिले पंधरा हजार व पुन्हा पंधरा हजार जमा करण्यात येत आहेत. अशी माहिती मिळाल्याचे दिनेश भोळे यांचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमा शंकर जमादार, आणि काही तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या बोलण्यातून पैसे जमा केले जात असल्याबाबत जाणवत आहेत. तरी हे पैसे कोणाच्या सांगण्यावरून व कोणासाठी जमविले जात आहेत. याबाबत चौकशी झाली पाहिजे. तसेच यंत्रणेच्या नावाखाली पैसा मागणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करावी. अशी मागणी देखील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली आहे.







