पाचोरा ( प्रतिनिधी ) – शेतात शेळी चारतांना पिकांमध्ये तुटून पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून पाचोरा तालूक्यातील कळमसरा येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना शुक्रवारी घडली.

विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने शेतकऱ्याचा नाहक बळी घेतल्याचा आरोप करत परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कळमसरा येथे अल्पभूधारक शेतकरी मधुकर नेटके (वय ५५ ) त्याच्या शिवारात शेळी चारण्यासाठी गेले होते शेळी अचानक पळाल्याने शेळीमागे पळत असतांना कापूस पिकात जमीनीवर तुटून पडलेल्या विद्युत ताराने जोरदार शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला
महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नाहक एक गरिबाचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळत आहे. कालच दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी विज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. बैठकीला काहीच तास होत नाही तोवर ही घटना घडली आहे.
कळमसरा शिवारात या परिसरात तारा तुटून पडले असल्याची वारंवार तक्रार करुनसुध्दा विद्युत वितरणचे कर्मचारी व अधिकारी यांनी लक्ष न देता उडवाउडवीची उत्तर देत कोणतीही कामे केली नसल्यामुळे यांच्या मनमानी पद्धतीने कामकाज सुरु असल्यामुळे या निष्पाप शेतकऱ्याचा हकनाक बळी गेल्याने कळमसरा परिसरातील नागरिकांनी संतप्त भावाना व्यक्त करत आहेत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.







