नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – दिल्लीत हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनद्वारे चुकीच्या पद्धतीनं केस कापल्याबद्दल महिलेला 2 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आलीय.
2018 मध्ये हॉटेल आयटीसी मौर्य येथील सलूनमध्ये कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं केस कापल्याबद्दल आणि चुकीची ट्रिटमेंट दिल्याबद्दल एका महिलेला राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या मध्यस्थीनं हॉटेल आयटीसी मौर्यकडून 2 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आलीय. तक्रारदार महिला ही केस उत्पादनांसाठीची मॉडेल आहे. न्या आर. के. अग्रवाल आणि डॉ. एस. एम. कांतीकर यांनी हा आदेश दिलाय.
“स्त्रिया त्यांच्या केसांच्या बाबतीत अत्यंत सावध आणि काळजी घेतात, यात शंका नाही आणि त्यांनी केस चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी एक मोठा खर्च केलाय, यातही दुमत नाही. त्या भावनिकरित्या त्यांच्या केसांशी जोडलेल्या असतात. तिच्या लांब केसांमुळे तक्रारदार महिला ही हेअर प्रॉडक्टची मॉडेल होती. उलटपक्ष हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनद्वारे सूचनांविरोधात केस कापल्यामुळे तिने तिची अपेक्षित असाइनमेंट गमावली आणि तिला मोठे नुकसान सोसावे लागले, ज्यामुळे तिची जीवनशैली पूर्णपणे बदलली आणि तिचे टॉप मॉडेल बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. तक्रारदार महिला तिचे मॉडेलिंग असाईनमेंट पुढे चालू ठेवण्याची योजना आखत होती, जी मुख्यतः केसांच्या उत्पादनांशी संबंधित होती आणि तिला चित्रपटातील भूमिका देखील ऑफर करण्यात आली होती. पण चुकीच्या हेअर कटमुळे तिला सर्व गमवावं लागलंय असे न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे .
12 एप्रिल 2018 रोजी तिने हॉटेल आयटीसी मौर्य येथील सलूनला केस कापण्यासाठी भेट दिली, कारण त्यावेळी तिला एका असाइनमेंटला जायचे होते. महिलेने तिची नियमित हेअर स्टाइल करण्यास सांगितले. पण ती उपलब्ध नव्हती आणि त्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या आश्वासनावर तिला दुसऱ्या पद्धतीची हेअर स्टाइल देण्यात आली. ते पाहून संबंधित महिला अचंबित झाली. मागच्या बाजूने तिचे केस तळापासून 4 इंच कापण्याची सूचना असतानाही हेअर स्टाइलिस्टनं त्याहून जास्त इंच केस कापले. पण त्यामुळे तिला चांगली असाइनमेंट गमवावी लागली. केसांवरच्या उपचारांसाठी वापरलेल्या प्रोडक्टनंही तिच्या टाळूवर सूज आली आणि तिचं नुकसान झाल्याचंही निरीक्षण आयोगानं नोंदवलं.
तिचे केस अशा पद्धतीनं कापण्यात आल्यानं तिला गंभीर मानसिक धक्का बसलाय. ती तिच्या नोकरीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीये. आयटीसी हॉटेल्स लिमिटेडच्या चुकीमुळे तिला हा मनस्ताप सहन करावा लागतोय. दोन वर्षांपासून ती महिला वेदना आणि आघात सहन करत आहे, असंही आयोगाने नोंदवले.







