पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा – भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशा मागणीचे निवेदन आज पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
काही दिवसांपासून पाचोरा – भडगाव तालुक्यासह परिसरात अवेळी व कमी – जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुरुवातीच्या काळात पाऊस लांबल्याने उडीद, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी या पिकांचे नुकसान झाले नंतर अतिवृष्टीमुळे कापसाला फटका बसला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. याकरिता पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, पिक आणेवारी ५० पैशांच्या आत लावण्यात यावी, धान्य व कडधान्य यांना हमीभाव जाहीर करुन शेतकऱ्यांच्या सर्व मालाची खरेदी शासनाने करावी, कापसाला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, नितीन तावडे, सतिष चौधरी, नगरसेवक तथा तालुका अध्यक्ष विकास पाटील, नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, बाबा देवरे , बाजार समिती प्रशासक रणजित पाटील, अजहर खान, सरला पाटील, रेखा देवरे, अभिलाषा रोकडे, उमेश एरंडे, सुदर्शन महाजन, गौरव शिरसाठ, निलेश पाटील, हेमंत पाटील, प्रदिप वाघ, विनोद पाटीलसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







