भुसावळ ( प्रतिनिधी ) — खासगी हॉस्पीटलच्या अति दक्षता कक्षामध्ये भरती असलेल्या रूग्णाने आज सकाळी दुसर्या मजल्यावरून उडी घेतली. यात त्याला दुखापत झाली.
शहरातील रिदम हॉस्पीटलमधील अतिदक्षता कक्षामध्ये दोन दिवसांपासून तळवेल येथील रूग्णावर उपचार सुरू होते. या रूग्णाने आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास मागील बाजूच्या खिडकीचे काच तोडून खाली उडी घेतली. दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतल्याने या रूग्णाला दुखापत झाली.
रूग्णालयातून उडी मारल्यानंतर हा रूग्ण थेट रस्त्यावर पळत सुटला. मात्र त्या रूग्णाच्या आप्तांनी पाठलाग करून त्याला पुन्हा समजावून रिदम हॉस्पीटलमध्ये भरती केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या रूग्णाने नेमकी कशासाठी उडी घेतली. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या संदर्भात रूग्णालयातर्फे लगेच काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.







