वाशिम ( वृत्तसंस्था ) – जिल्ह्यातील चाकातीर्थ प्रकल्प परिसरात रखवालदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली घरात अज्ञात हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने वार करून या वयोवृद्ध रखलवालदाराची भरदुपारी हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाशिम जिल्ह्याच्या डव्हा येथील हे दाम्पत्य रहिवासी असून, गजानन निंबाळकर (वय 60) आणि निर्मला निंबाळकर -देशमुख (वय 55) अशी हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावं आहेत. निंबाळकर दाम्पत्य अनेक वर्षांपासून चाका तीर्थ प्रकल्प परिसरात मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते.
रविवारी दुपारी अज्ञात हल्लेखोर ते राहत असलेल्या घरात शिरले आणि त्यांनी भीषण हल्ला चढवला. हल्लेखोरांनी गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर यांची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली.
घराचे दार उघडे असल्याचे पाहून स्थानिक लोक निंबाळकर यांची विचारपूस करण्यासाठी गेले असता दोघांचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आले . त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी पंचनामा केला. निंबाळकर दाम्पत्याची हत्या का आणि कशासाठी करण्यात आली असावी, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे. पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
या वृद्ध दाम्पत्याची हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली याचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. हत्या झालेल्या ठिकाणी कुऱ्हाड मिळून आली असून, हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू असून, लवकरच तपास करून माहिती देणार असल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितलं.







