जळगाव ( प्रतिनिधी ) – संघटनेचे विभागीय सचिव आणि चालक शैलेश नन्नावरे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून निलंबनाची करावी केली म्हणून सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी यांना निलंबित करावे आणि खोटा गुन्हा रद्द करावा. या मागणीसाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने आजपासून मध्यवर्ती बस स्थानकासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.

उपोषणाच्या ठिकाणी या संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुरेश तायडे यांच्यासह उपोषणात सहभागी कर्मचाऱ्यांनी भूमिका मांडली . या संघटनेचे म्हणणे आहे की , या संघटनेचे विभागीय सचिव शैलेश नन्नावरे १४ जून रोजी कर्मचाऱयांची समस्या घेऊन गेले होते त्यावेळी सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती त्यानंतर नन्नावरे जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नव्हता, त्यानंतर वरिष्ठ आगार व्यवस्थापक व आगार व्यवस्थापक यांनी मर्जीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून नन्नावरे यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करायला लावला होता. या मारहाणीच्या खोट्या गुन्ह्याच्या आधारावरच त्यांना नंतर निलंबित करण्यात आले. मारहाण वास्तवात झालेली नसताना त्यातील फिर्यादी कर्मचारीच जबाब नोंदवून घेण्याची तत्परता पोलिसांनी का दाखवली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्याचे एस टी महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजूनच घेत नाहीत,असा आरोपही या संघटनेने केला आहे. सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज तिवारीसारख्या अधिकाऱ्यांकडून न्याय तर सोडा पण आम्हाला सहकार्याचीही अपेक्षा नाही, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.







