नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )- पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील. हरीश रावत यांनी ही घोषणा केली. चन्नी दलित समाजातून येतात. ते कॅप्टन सरकारमध्ये मंत्री होते.
चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत. विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी प्रथमच मीडियासमोर आले. त्यांना प्रसारमाध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी राज्यपाल सभागृहातून बाहेर आल्यानंतर बोलू असे सांगितले. ते संध्याकाळी 6.30 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत. चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले, की हा हायकमांडचा निर्णय आहे. मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत.”