पुणे ( वृत्तसंस्था ) – चोरी करण्यास विरोध केल्याने वॉचमन महिलेचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी किवळे येथे उघडकीस आली.

सौंदव सोमेरू उराव (वय 40) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती सोमेरू येतावा उराव (वय 46, सध्या रा. किवळे ब्रीज जवळ, किवळे. मूळ रा. बंगाल) यांनी देहूरोड पोलीस ठाण्याच्या रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली.
फिर्यादी सोमेरू यांची पत्नी सौंदव ही ते राहत असलेल्या गोविंद बिल्डर यांच्या बांधकाम साइटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर गेली. सायंकाळी तिचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या लिफ्टच्या खड्ड्यात मिळून आला. चोरट्यांनी बांधकाम साइटवरील रोख 30 हजार रुपये, 700 रुपयांची चांदीची चेन आणि सहा हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे झुबे असा ऐवज चोरून नेला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.







