बीड (वृतसंस्था) – विहिरीत पडलेल्या दीड वर्षाच्या मुलीला वाचवायला विहिरीत उडी घेतलेल्या आईचा तिच्या चिमुकलीसह मृत्यू झाला ही दुर्देवी घटना केज तालुक्यातील बानेगाव येथे घडली. विहिरीतून पाण्याबाहेर काढल्यानंतर मुलगी आईच्या कुशीत आढळून आली. आईला घट्ट मिठी मारली होती. आईने चिमुकलीचा हात घट्ट धरला होता …..
. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतो आहे. आशा सुंदर जाधवर (वय 22 ) व कु.शांभवी (दीड वर्ष) अशी मायलेकींची नावे आहेत. आशा जाधवर यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह सुंदर जाधवर (रा. वडजी ता. वाशी जि. उस्मानबाद) यांच्याशी 3 वर्षांपूर्वी झाला होता. आशा जाधवर व सुंदर जाधवर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात वास्तव्यास होते. कोरोनात पतीचं निधन झालं. नैराश्यात असलेल्या आशा जाधवर 2 दिवसांपूर्वी आपल्या मुलीसह माहेरी बानेगावला आल्या. गुरूवारी वडील बाहेरगावी गेले होते आणि आई शेतीच्या कामात होती. सायंकाळी आशा जाधवर यांनी मुलगी शांभवीला शेतात नेले.
खेळता-खेळता शांभवी विहिरीजवळ गेली. तिचा तोल जात ती विहिरीत पडण्याची शक्यता निर्माण झाली. आई धावत विहिरीजवळ गेली आणि आईचाच तोल गेल्याने दोघेही मायलेकी विहिरीत पडल्या. त्या दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. गुरूवारी रात्री उशिरा मायलेकींचे मृतदेह विहिरीतून काढण्यात आले शवविच्छेदन करून शुक्रवारी मायलेकींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत.